बिहारमधील बक्सर आणि आरा दरम्यान बुधवारी 11 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 वाजता नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेसला (गाडी क्र. 12506) अपघात झाला. यात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक प्रवासी जखमी झालेत. मदत आणि बचाव कार्यानंतर आता रेल्वेतील तज्ज्ञांच्या चमूने या अपघाताच्या कारणांचा शोध घेणे सुरू केलेय.
अपघाताबाबत माहिती देताना रेल्वे गार्डने सांगितले की, अपघाताच्या वेळी ट्रेन ताशी 120 किलोमीटर वेगाने धावत होती. अचानक ब्रेक लागला आणि ट्रेन रुळावरून घसरली. पोल क्रमांक 629/8 ला वक्र होता. येथून रेल्वेच्या चार बोगी निघाल्या. त्यानंतर एकामागून एक सर्व बोगी रुळावरून घसरू लागल्या. ही गाडी येण्याच्या अर्धा तास आधी या ट्रॅकवरून पॅसेंजर ट्रेन (03210) गेली होती.या घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमसह पाटणा, आराह आणि बक्सर येथील रेल्वेच्या बचाव पथकाने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅकला तडा गेल्याने हा अपघात झाला आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.रेल्वेच्या तज्ज्ञांची चमू घटनास्थळाचे निरीक्षण करून तपास करीत आहे. त्यानंतर या अपघाताचे नेमके कारण समजण्यास मदत मिळणार आहे.