बेळगाव विमानतळाच्या जवळील शेतात वैमानिकांना प्रशिक्षण देणारे विमान कोसळले. प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक असे दोघे जण विमान अपघातात जखमी झाले आहेत. रेडबर्ड कंपनीतर्फे बेळगाव विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण दिले जाते. रोजच्या प्रमाणे रेडबर्ड कंपनीचे विमान प्रशिक्षण देण्यासाठी आकाशात झेपावले.उड्डाण केल्यावर काही सेकंदात विमानात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि विमान खाली कोसळले.
सुदैवाने विमानातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी हे या अपघातात बचावले.दोघेही जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील होनिहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात मंगळवारी सकाळी प्रशिक्षणाचे विमान कोसळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्निहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे.
















