सोलापूर महापालिकेकडून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वादग्रस्त चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे कारखान्याच्या चारी बाजूने दोन किलोमीटर अंतरावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. कारखान्याच्या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला असून कोणत्याही जमावाला या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव एडवोकेट एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते हातात माकपचे लाल झेंडे घेऊन गोदूताई परुळेकर वसाहतीकडून कारखान्याकडे निघाले होते.
दरम्यान शेख यांनी माध्यमांशी बोलताना, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जर पाडली तर सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न गंभीर होणार आहे. याला आम्ही विरोध करत आहोत. कालपासून पोलीस आयुक्तांनी या भागात जमावबंदी आदेश लागू केलेला आहे तो आम्ही भंग करत आहोत, असे जर मोठे उद्योग बंद पडले तर निश्चितच बेकारी वाढेल त्यामुळे या चिमणी पाडकामला आमचा विरोध असेल अशी भूमिका शेख यांनी मांडली.