हिंदू धर्म हा इस्लामहून जुना असून भारतीय मुसलमान धर्मांतरित हिंदू असल्याचे विधान डेमॉक्रटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे संस्थापक गुलाम नबी आझाद यांनी केले. आझाद यांनी जम्मू-काश्मिरातील डोडा जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात हे वक्तव्य केले असून यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये आझाद म्हणतात ती, ‘इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला होता. भारतात कोणीही बाहेरचा नाही. आपण सर्व या देशाचे आहोत. भारतातील मुस्लिम हे मूळचे हिंदू होते, त्यांनी नंतर धर्मांतर केले. सुमारे 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये फक्त काश्मिरी पंडित होते. त्यानंतर अनेक लोक धर्मांतर करून मुस्लिम झाले. मृत्यूनंतर हिंदू आणि मुस्लीम दोघेही या भूमीत जातात. त्याचे मांस आणि हाडे देखील या भारतभूमीत सामावतात. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन या हिंदू-मुस्लीम भेदांना तिलांजली द्यावी असे आवाहन आझाद यांनी केले. यावेळी आझाद यांनी लोकांना बंधुभाव, शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले. यावेळी धर्माला राजकारणाशी जोडणाऱ्यांवरही गुलाम नबी आझाद यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘राजकारणात जो धर्माचा आधार घेतो तो कमजोर असतो. ज्याची स्वतःवर श्रद्धा आहे, तो धर्माचा आधार घेणार नाही. मी पुढे काय करणार, विकास कसा आणणार हे योग्य व्यक्ती सांगेल. पण जो दुर्बल आहे तो म्हणेल की मी हिंदू आहे की मुस्लिम. म्हणूनच मला मत द्या. राजकारणात धर्म मिसळून धर्माच्या नावावर मतदान करू नये असे आझाद यांनी सांगितले.