मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी जमातींमधील संघर्ष पुन्हा एका उफाळून आला असून राज्यात तणावाची स्थिती निर्माण झालीय. राजधानी असलेल्या इंम्फाल शहरात बुधवारी संध्याकाळी गोळाबाराची घटना घडली. त्यानंतर सुरक्षेची उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन प्रभावित झालेय.
मणिपूरमध्ये मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांवर गोळीबाराच्या 2 घटना घडल्या. पहिले प्रकरण तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह भागातील आहे. याठिकाणी चिंगथम आनंद कुमार या पोलीस अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर परिसरात तैनात करण्यात आलेल्या पोलीस पथकावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 3 पोलीस जखमी झाले. या दोन घटनांनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवून बुधवारी मणिपूर पोलिसांनी 44 जणांना ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींपैकी 32 लोक म्यानमारचे नागरिक आहेत. या कारवाईनंतर इम्फाल शहरात गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे सुरक्षादलांनी इम्फाल शहरात संचारबंदी घोषित केली. एकंदर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळण्याची भीती व्यक्त केली जातेय.