‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी (पीएफआय) संबंधित प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. एनआयएने बुधवारी सकाळी मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये धाडी टाकल्या आहेत.
एनआयएने पीएफआय या दहशतवादी मॉड्यूलचे धागेदोरे खोदून काढत मुंबईतील विक्रोळी परिसरात वाहिद शेख याच्या घरावर धाड टाकली आहे. यासोबतच उत्तरप्रदेश आणि मदुराई येथे देखील एनआयएने कारवाई केली आहे. मागील वर्षी एनआयएने दिल्लीतील बलिरामन परिसरात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात यूएपीए अंतर्गतही गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास करत असताना राष्ट्रीय तपास यंत्रणेला तामिळनाडू आणि महाराष्ट्रात धागेदोरे मिळाले आहेत. त्यामुळे एनआयएने मदुराई आणि मुंबईत आज, बुधवारी सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे.
मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या 11 जुलैच्या बॉम्बस्फोट प्रकरणात वाहिद शेख हा आरोपी होता. मात्र न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले आहे. तेव्हापासून सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. याच प्रकरणात संशयित ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे. त्यात वाहिद शेख याच्या विक्रोळीतील घरावरही छापेमारी करण्यात आली.