हॉलिवूड म्यूझिक इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर आली आहे. अमेरिकन गायिका लिसा मॅरी प्रेस्ली यांचं वयाच्या ५४ वर्षी निधन झालं आहे. १२ जानेवारी रोजी लॉस एंजेलिसमधील एका रुग्णालयात त्यांचं कार्डियक अरेस्टने निधन झालं आहे. लिसा यांना त्यांच्या घरातच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला. एपीनफ्राइन नावाचं इंजेक्शनही त्यांना दिलं गेलं. या उपचारानंतर त्यांच्या नाडीचे ठोके पुन्हा सुरू झाले होते, मात्र काही वेळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी गोल्डन ग्लोब अवॉर्डला हजेरी लावली होती.
लिसा मॅरी प्रेस्ली यांचा जन्म १९६८ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्या ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांचं पालनपोषण केलं. लिसा यांनी आपल्या करिअरची सुरुवात म्यूझिक इंडस्ट्रीतून केली होती. लिसा यांचं खासगी आयुष्य अनेकदा वादात राहिलं. त्यांनी चार लग्न केली होती. त्यापैकी एकही लग्न यशस्वी होऊ शकलं नाही. लिसा यांनी १९८८ मध्ये संगीतकार डॅनी कियॉग्घ यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर १९९४ मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर लिसा यांनी मायकल जॅक्सनसोबत लग्न केलं. १९९४ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर केवळ दोन वर्षात ते एकमेकांपासून विभक्त झाले.
दोन लग्नांनतर त्यांनी अभिनेता निकोलस केजसह तिसरं लग्न केलं. हे लग्न २००२ ते २००४ पर्यंत टिकलं. पुढे संगीत निर्माते मायकल लॉकवूडसह त्यांनी चौथं लग्न केलं होतं. २००६ मध्ये त्यांनी लग्न केलं, मात्र २०२१ मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले.