पाकिस्तानच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर बाबर आणि रिझवाननं डाव सावरला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानची मधली फळी ढेपाळली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील यंदाच्या वर्ल्डकपमधील सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडतोय. भारतानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्ताननं ३० व्या ओव्हरपर्यंत २ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मानं ठेवलेला विश्वास मोहम्मद सिराजनं सार्थ करुन दाखवत बाबर याला बाद केलं. त्यानंतर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी देखील दोन विकेट घेत पाकिस्तानच्या मधली फळी तंबूत परत पाठवली आणि पाकिस्तानं अवघ्या १६ धावांमध्ये पाच विकेट गमावल्या.
पाकिस्ताननं सावध आणि आक्रमक सुरुवात करत पहिल्या १० ओव्हरमध्ये सामन्यावर नियंत्रण ठेवलं होतं. पाकिस्तानला पहिला धक्का दहाव्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज यानं दिला. सिराजनं अब्दुल शफिकला बाद केलं. त्यानंतर हार्दिक पांड्यानं इमरान उल हकला बाद केल्यानंतर मैदानावर असलेल्या बाबर आणि रिझवान या दोघांनी पाकिस्तानचा डाव सावरला होता. बाबर आणि रिझवाननं ८३ धावांची भागिदारी करत ३० व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं.
रोहित शर्मानं मोहम्मद सिराज याच्याकडे ३० व्या ओव्हरमध्ये बॉलिंगची जबाबदारी सोपवली. यावेळी मोहम्मद सिराज यानं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला बोल्ड आऊट केलं. बाबर आणि रिझवान या दोघांनी ८३ धावांची भागिदारी केली होती. मात्र, सिराजच्या भेदक माऱ्यापुढं बाबरचा टिकाव लागला नाही. तो ५० धावा करुन बाद झाला.
बाबर बाद झाला अन् विकेटची माळ लागली
पाकिस्तानचा कर्णधार बाबर ५० धावा करुन बाद झाला तेव्हा त्यांच्या संघाची धावसंख्या ३ बाद १५५ अशी झाली होती. पुढच्या १६ धावांमध्ये पाकिस्ताननं आणखी चार विकेट गमावल्या.त्यामध्ये मोहम्मद रिझवान सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान यांचा समावेश आहे. मोहम्मद रिझवान आणि शादाब खान या दोघांना बुमराहनं बाद केलं. तर सौद शकील आणि इफ्तिखार अहमद यांना कुलदीप यादवनं बाद केलं. रिझवान त्याचं अर्धशतक देखील पूर्ण करु शकला नाही तो ४९ धावांवर बाद झाला.