राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केलाय. ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा नियमीत जामीन मंजूर करण्यात आलाय. याप्रकरणी पुढील सुनावणी 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
‘लँड फॉर जॉब’ प्रकरणातील लालू आणि राबडी यांच्यासह 6 आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व सहाही आरोपींना जामीन मंजूर केला आहे. सीबीआयने या वर्षी 18 मे रोजी जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना लोकांना रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या बदल्यात जमिनी घेतल्याचा आरोप आहे. गेल्या 3 जुलै रोजी सीबीआयने या प्रकरणी सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली होती.
तेव्हा सीबीआयने कोर्टात सांगितले होत की, गृह मंत्रालयाकडून लालू यादव यांच्यासह इतर आरोपींविरोधात खटला चालवण्याची परवानगी मिळाली आहे. या चार्जशीटमध्ये सुरुवातीलाच तेजस्वी यादव यांचे नाव आले होते. त्यावेळी सीबीआयने लालू यादव, राबडी देवी यांच्यासह 16 जणांना आरोपी बनवण्यात आलेय. यामध्ये रेल्वेचे अधिकारी आणि नोकरी मिळवणाऱ्यांचा समावेश होता.