जुन महिना सुरु झाल्यावर बुधवारी दुसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे, यावेळी पावसासह जोरदार वारा देखील पाहायला मिळाला. त्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली होती. तसेच अनेक भागांत वीज गुल झाल्याने याचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 8 झाडे उन्मळून पडली आहे. तसेच वीज गायब झाल्याचे 150 कॉल कंट्रोल रूमला आल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, जोरदार पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचल्याने पंपिंग मशीनने पाण्याचा उपसा करावा लागला. वादळवाऱ्यामुळे झाड पडून तारा तुटल्याने शहरातील काल्डा कॉर्नर परिसरातील दहा हजार घरांची वीज गुल झाली होती.
बुधवारी दुपारपर्यंत शहरात उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र सायंकाळी अचानक पावसाचे वातावरण तयार झाले. तसेच 42 किलोमीटरने वेगाने वादळी वारे वाहू लागले. त्यामुळे अचानक सुरु झालेल्या पावसाने संभाजीनगरकरांची तारांबळ उडाली. तसेच जोरदार वाऱ्यामुळे एकूण 8 ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ज्यात रोपळेकर चौक येथे देवगिरी बँक शेजारी दुचाकीस्वारांच्या अंगावर झाडं पडली. अग्निशमन दलातील जवानांनी त्ताकाळ धाव घेत त्यांना वाहनांसह त्वरित बाहेर काढले. सिंधी कॉलनी येथे एक झाड रस्त्यावर पडला. याशिवाय उल्कानगरी या ठिकाणी झाड विद्युत तारांवर पडला होता. तसेच प्रताप नगर म्हाडा कॉलनी स्मशानभूमी जवळ एका रिक्षावर झाड पडले. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल जवळ देखील एक झाडं पडले.
दहा हजार घरांची वीज गुल
शहरातील काल्डा कॉर्नर परिसरातील झांबड इस्टेटमध्ये वादळवाऱ्यामुळे झाड पडून तारा तुटल्याने बुधवारी सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी परिसरातील आठ ते दहा मोठ्या वसाहतींमधील सुमारे दहा हजार घरांची वीज गुल झाली होती. सुमारे पाच तासांनी या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुटलेल्या वाऱ्यामुळे झांबड इस्टेट परिसरातील झाड उन्मळून पडले. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या, तीन खांबही वाकले. ही माहिती नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाला कळविली. यानंतर अभियंते आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विजेचे खांब वाकल्याने तसेच तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. या लाइनवर 40 ट्रान्स्फार्मर असून, त्यांद्वारे सुमारे 9 ते 10 हजार ग्राहकांना वीज कनेक्शन देण्यात आलेले आहे. त्यामुळे झांबड इस्टेट, चेतनानगर, टिळकनगर, सम्राटनगर, श्रीकृष्णनगर, विश्वभारती कॉलनी, शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक, बौद्धनगर, नाथनगर आदी भागांतील वीज गेली होती. तर वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान पाच ते साडेपाच तास लागले.