बोगस लाभार्थींना घरे देणे असो अथवा अनेक मालमत्तांची हेराफेरी करण्याचे प्रकार असोत. ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात अनियमितता असुन अक्षरश: बजबजपुरी बोकाळली आहे. तेव्हा, हा संपुर्ण लेखाजोखा समोर येण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढा. अशी आग्रही मागणी आमदार संजय केळकर यांनी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेचा स्थावर मालमत्ता विभाग येनकेन प्रकारे नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असतो. स्थावर मालमत्ता विभागाकडुन टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप दिव्यांग बांधव तसेच अनेक लाभार्थ्यानीही केला होता. मध्यंतरी अनेक आरोप झाल्याने महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी महेश आहेर यांच्याकडे असलेल्या या विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक पदाचा पदभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला. तरीही कारभारात सुधारणा होत नसल्याने आ.संजय केळकर यांनी शनिवारी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन चर्चा केली.
रस्ता रुंदीकरणात जागा गेलेले, घरे गेलेले बरेच वंचित आहेत, ज्यांना अनेक वर्ष उलटली तरी अद्याप जागा व घरे दिलेली नाही. कित्येकांना तर साधे पत्रही दिलेले नाही. कुठल्याही मालमत्तांचा हिशोब लागत नाही. नागरीक वर्षानुवर्ष खेटा मारतात तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही. बोगस लाभार्थी दाखवुन पुर्नवसनाच्या नावाखाली जागा बहाल केल्या आहेत. इतकी अनियमितता असुन स्थावर मालमत्ता विभागात अक्षरशः बजबजपुरी बोकाळली आहे. याकडे आ. केळकर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधून याचा संपुर्ण लेखाजोखा समोर येण्यासाठी स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढावी. अशी मागणी केली आहे. त्यानुसार आयुक्तांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.
नविन शोधाच ; आधी ”त्या” अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकमाबाबत नियोजन बैठकीत वारंवार आवाज उठवल्यानंतर आता महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. अनधिकृत बांधकामांवर आता कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले, तसेच अशा बांधकामांना वीज पुरवठा करू नये, यासाठी एमएसईबीला पत्र दिले,पाणी पुरवठा विभागालाही आयुक्तांनी निर्देश दिले. याचे स्वागत आहे. पण नविन बेकायदा बांधकामे शोधाच परंतु याआधी ज्यांना नोटीसा बजावल्या, ज्यांच्यावर एमआरटीपी दाखल केल्या आहेत. ”त्या” बांधकामांवर आधी कारवाई करा. असेही आ. संजय केळकर यांनी बजावले आहे.