पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात ड्रग्जचा साठा सापडण्याच्या घटना थांबता थांबत नाही. अंमली पदार्थांचे हब झालेल्या पुणे शहरात गुन्हे शाखेने लोहगाव येथून तब्बल १ कोटी ८९ हजार ४६० रुपयांचा माल जप्त केला आहे. या कारवाईत तिघांना अटक केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे (२१, रा. धानोरी), रोहित शांताराम बेंडे (२१, रा. लोहगाव), निमिश सुभाष अबनावे (२७, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, टिंगरेनगर, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस हवालदार संदिप दामोदर शिर्के यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंगरेनगर येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट येथे तिघे जण आले असून त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याचा संशय असल्याची बातमी अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन पाहिले असता तिघे जण रोडच्या कडे उभे होते. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे ४७१ ग्रॅम मेफेड्रॉन(एम डी), ४ मोबाईल, दुचाकी, कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा १ कोटी ८९ हजार ४६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.