सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज अक्कलकोट रोडवरील गांधीनगर परिसरात रस्त्यावर उभारलेल्या अतिक्रमित पत्र्याच्या शेडच्या घरांवर धडक कारवाई करत दोन घरे जमीनदोस्त केली. मात्र, झोन अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ही मोहीम अर्धवट थांबवण्यात आली असून, 31 मार्चपर्यंत कारवाई स्थगित करण्यात आल्याने प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिक्रमण प्रतिबंधक अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली.
सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील गांधीनगर येथे तीस फूट रस्त्यावर 5 पत्रा शेडची घरे अनधिकृतपणे उभारण्यात आली. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी मनपा झोन क्रमांक तीनचे पत्र आणि विधान सल्लागार यांच्या अभिप्रायानुसार घटनास्थळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे पथक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाले.कारवाई सुरू होताच काही रहिवाशांनी मोहीम थांबवण्याची विनंती केली. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल न घेता नियोजित कारवाई सुरूच ठेवली.परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमित दोन पत्रा शेडची घरे हटवण्यात आली.
दरम्यान, कारवाई सुरू असतानाच झोन क्रमांक तीनचे कनिष्ठ अभियंता घटनास्थळी दाखल झाले. झोन अधिकारी बक्षी यांनी ही कारवाई 31 मार्चपर्यंत थांबवण्याची सूचना अधीक्षक बनसोडे यांना मोबाईल वरून केली. अचानक कारवाई थांबून मुदतवाढ दिल्याने बनसोडे संतप्त झाले. त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली.
आम्ही विधी सल्लागाराचा अभिप्राय घेऊन तसेच झोनल अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू केली आहे. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना अचानक कारवाई थांबवणे योग्य नाही. यापूर्वी संबंधित झोन अधिकारी यांनी दोन वेळा ही कारवाई पुढे ढकलली होती. आता पुन्हा तोच प्रकार केला आहे, असे सांगत बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली.
झोन अधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकांना 31 मार्चपर्यंत मुदत दिल्याने अखेर ही कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारवाई थांबल्यानंतर अतिक्रमणधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या विभागांमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील कारवाई 31 मार्चनंतर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

























