व्हेनेझुएलामध्ये बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असलेली सोन्याची खाण कोसळून २३ जण ठार झाल्याची माहिती आहे. स्थानिक अधिकारी योर्गी अर्सिनिएगा यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना या घटनेविषयी माहिती दिली. ढिगार्याखाली अजून किती लोक दबले आहेत, याची अचूक माहिती देणे अद्याप शक्य नाही.
अर्सिनिएगा यांनी सांगितले की, बोलिव्हर राज्यातील जंगलात बुल्ला लोका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुल्या खड्ड्यातील खाणीतून सुमारे २३ मृतदेह बाहेर काढले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी झाली होती. काल बुधवारी या खाणीत २३ मृतदेह आढळून आले.
नागरी संरक्षण उपमंत्री कार्लोस पेरेझ अँप्युइडा यांनी एक्सवर या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एका खुल्या खाणीत काम करत असलेल्या लोकांवर खाण हळूहळू कोसळत असल्याचे दिसते. काही जण खाणीतून बाहेर पडताना दिसत आहेत. तर काही जण त्यात अडकले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खाणीत सुमारे २०० लोक काम करत होते. हे ठिकाण ला पॅराग्वा शहरापासून सात तासांचा बोटीतून प्रवास करून येथे पोहोचले.
बोलिव्हर राज्याचे नागरिक सुरक्षा सचिव एडगर कोलिना रेयेस यांनी सांगितले की, खाण दुर्घटनेतील जखमींना राजधानी कराकसच्या आग्नेयेला ७५० किलोमीटरवर (४६० मैल) ला पॅराग्वापासून चार तासांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. शोधकार्यात मदत करण्यासाठी कराकसमधून बचाव पथकेही पाठवण्यात आली आहेत.
बोलिव्हर प्रदेश हा सोने, हिरे, लोह, बॉक्साईट, क्वार्ट्ज आणि कोल्टन आदी खनिज संपत्तीने समृद्ध आहे. येथे राज्याच्या खाणींव्यतिरिक्त बेकायदेशीर उत्खननही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याच प्रदेशातील इकाबारू या आदिवासी भागातील खाण कोसळून सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला होता.