पारध – भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रवींद्र लोखंडे हे तब्बल ३७ वर्षांची प्रदीर्घ व निष्ठेची शैक्षणिक सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांनी कृतज्ञतेने त्यांचा गौरव केला.
मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असताना लोखंडे सरांनी नियमितता, शिस्त आणि अध्यापनातील समर्पण याचा आदर्श निर्माण केला. एकही दिवस गैरहजर न राहता, दररोज वेळेवर शाळेत उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण केली. मराठी विषय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकवून अनेक विद्यार्थ्यांना भाषेची आवड निर्माण करून दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज डॉक्टर, पीएसआय, अधिकारी तसेच विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून आपल्या यशाचे श्रेय लोखंडे सरांना देतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी नेहमीच विशेष मेहनत घेतली.
सेवापूर्ती प्रसंगी शिक्षक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालकांनी त्यांचा सत्कार करून “लोखंडे सर म्हणजे शिस्त, संस्कार आणि शिक्षणाचा संगम” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.





















