पारध -“विद्यार्थी आहेत म्हणून शाळा भरते आणि शाळा भरते म्हणून शिक्षक कार्यरत असतात. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना दैवत मानून तब्बल ३७ वर्षे संस्थेत सेवा केली,” असे भावनिक उद्गार सेवानिवृत्त शिक्षक रवी लोखंडे यांनी आपल्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात उत्तर देताना काढले.
रवी लोखंडे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनी लोखंडे यांचा सत्कार जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि.६ रोजी करण्यात आला होता.आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर, सहकारी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पो. निरीक्षक संतोष माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “हे युग एआय टेक्नॉलॉजीचे आहे. त्यामुळे अभ्यास अधिक सोपा व सुलभ झाला आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून प्रगती साधावी.” तसेच त्यांनी रवी लोखंडे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.पर्यवेक्षक महेंद्र लोखंडे यांनी देखील रवि लोखंडे यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.माजी विद्यार्थी सागर देशमुख यांनी बोलताना रवी लोखंडे यांचा शैक्षणिक अनुभव, पत्रकारितेतील सहकार्य व त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “त्यांच्याकडून शिकलेले ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव उदयसिंह लोखंडे हे होते तर स. पो .नि. संतोष माने, एस.बी.आय.चे शाखाधिकारी अजय ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष सुनील वानखेडे,संचालक संजय लोखंडे,प्राचार्य शर्मिला शिंदे लोखंडे,प्रल्हाद सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संग्राम देशमुख यांनी केली.शेवटी उपस्थितांनी लोखंडे सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण निरोप दिला व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



















