मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे अनेकजण घाबरून घराबाहेर आले. हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू असून ३.६ तर ४.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यांतील गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांनाही तडे गेले आहेत.
याबाबत एमजीएमच्या खगोलशास्त्र अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की, आज सकाळी ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली. वसमत तालुक्यात (जि. हिंगोली) असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. काही वेळातच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का नोंदवला गेला. मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वांत मोठे धक्के असल्याचे औंधकर म्हणाले.