मुंबईच्या काळाचौकी परिसरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. मिंट कॉलनी परिसरातील एका शाळेत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
सुदैवाने संक्रांतीची सुट्टी असल्याने शाळा बंद होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शाळा बंद असल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काळाचौकी येथील मिंट कॉलनी परिसरात साईबाबा पथ संकुल शाळा आहे. या शाळेत तब्बल ६ सिलिंडरचे स्फोट होऊन भीषण आग लागली. एकापाठोपाठ एक सहा स्फोटांचा आवाज आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या शाळेत एक लग्नाचा हॉल असल्याचीही माहिती आहे. याठिकाणी केटरींगचा व्यवसाय चालतो, त्यासाठी ही सिलिंडर तिथे ठेवले असून त्याचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.