मुंबई – खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि विद्यार्थी क्रीडा केंद्र यांच्या आयोजनाखाली सुरु झालेल्या ६२ व्या जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेने परळच्या मैदानाला जणू रणभूमीचे स्वरूप दिले. खेळाडूंची अफाट चपळाई, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेले हाय-व्होल्टेज सामने आणि एका गुणावर ठरलेले निकाल यामुळे प्रेक्षक अक्षरशः खिळून राहिले. बँक ऑफ इंडिया, मुंबई पोलीस, नेव्हल डॉक, महावितरण, रचना नोटरी व विद्यार्थी क्रीडा केंद्र या संघांनी विजयी सलामी देत पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला.
बँक ऑफ इंडियाचा थरारक विजय – महानगरपालिकेचे आव्हान मोडीत
अत्यंत चुरशीच्या लढतीत बँक ऑफ इंडियाने बृहन्मुंबई महानगरपालिका संघावर १५-१४ असा अवघ्या १ गुणाने आणि २ मिनिटे शिल्लक राखून विजय मिळवला. बँक ऑफ इंडियाकडून जनार्दन सावंत (२:१० मि. अटॅक, १ मि. संरक्षण व २ गुण), राज सकपाळ (२:४० मि. संरक्षण व २ गुण), अर्पित तिवारी (२ मि. संरक्षण व २ गुण), रवींद्र झोरे (१:५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी निर्णायक कामगिरी केली. पराभूत महानगरपालिकेकडून पीयूष घोलम (१:४० मि. अटॅक, १ मि. संरक्षण व ३ गुण), आदित्य पाटील (१:३० मि. अटॅक, १ मि. संरक्षण व १ गुण), करण गारोळे (१:३० मि. अटॅक, १:३० मि. संरक्षण) यांनी झुंजार खेळ केला.
मुंबई पोलीसांचा ‘खाकी’ दरारा – डी.डी. अॅडव्हर्टायझिंग पराभूत
मुंबई पोलीस संघाने डी.डी. अॅडव्हर्टायझिंग संघावर २०-१५ असा ५ गुणांनी विजय मिळवत आपली विजयी घोडदौड सुरू केली. पोलिसांकडून अक्षय मिरगळ (१:४० मि. अटॅक, १ मि. संरक्षण व ३ गुण), विशाल गायकवाड (१:३० मि. अटॅक, २ मि. संरक्षण व १ गुण), सोहेल कलावंत (१:४० मि. संरक्षण व ३ गुण), सोहेल शेख (१:१० मि. संरक्षण व ५ गुण) यांनी मैदान गाजवले. डी.डी. कडून हर्षित कोळी (२:२० मि. अटॅक, १:२० मि. संरक्षण व २ गुण), आकाश मटकर (२ मि. संरक्षण), साहिल जमासुतकर (१:३० मि. संरक्षण व ३ गुण) यांची झुंज अपुरी ठरली.
नेव्हल डॉकची सफेदिची चमक – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धक्का
एका अटीतटीच्या सामन्यात नेव्हल डॉक संघाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघावर १४-१३ असा १ गुणाने विजय मिळवला. नेव्हल डॉककडून वैभव मोरे (२ गुण, २:३० मि. संरक्षण), सार्थक जंगम (२ गुण, २:४० मि. संरक्षण व १ गुण), हितेन भोईर (१:४० मि. संरक्षण), अनंत साठले (२ मि. संरक्षण व २ गुण) यांनी निर्णायक भूमिका बजावली.
महावितरणचा दत्तकृपाला झटका
महावितरण संघाने दत्तकृपा संघावर १२-११ असा १ गुणाने विजय मिळवत सामना ५:५० मि. शिल्लक असताना संपवला. महावितरणकडून अनिकेत चेंदवणकर (२ गुण, नाबाद १ मि. संरक्षण व ३ गुण), प्रतिक घाणेकर (२:१० मि. संरक्षण व १ गुण), प्रतिक वाईकर (१:४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी प्रभावी खेळ केला. दत्तकृपाकडून कार्तिक बेर्डे, यश दुर्गावले, तेजस सनगरे यांची लढत कमी पडली.
रचना नोटरीचा विजय – गंधेकर एलेक्ट्रिकल्स नामोहरम
रचना नोटरी संघाने गंधेकर एलेक्ट्रिकल्स संघावर १५-१३ असा २ गुणांनी आणि ७ मिनिटे शिल्लक राखून विजय मिळवला. रचनाकडून हितेश आंग्रे, सदाशिव पालव, राहुल जावळे यांनी चांगली कामगिरी केली, तर गंधेकरकडून अक्षय भोईर, निखील कदम, मोहक सावंत यांनी प्रतिकार केला.
४ फूट ११ इंच गट – विद्यार्थी क्रीडा केंद्राचा महाविजय
४ फूट ११ इंच गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने श्री समर्थ व्यायामंदिर संघावर १३-१ असा १२ गुणांच्या फरकाने आणि एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. विजयी संघाकडून कार्तिक चांदोरकर (७ मि. संरक्षण व २ गुण), विघ्नेश जाधव (नाबाद ५:५० मि. संरक्षण व १ गुण), साईराज जाधव (१:१० मि. संरक्षण व २ गुण), शौर्य जाधव (४ गुण) यांनी अफलातून खेळ केला. पराभूत संघाकडून कृशल व अनुज यांनी झुंज दिली.
ओम समर्थ व्यायाम मंदिर संघाने वैभव स्पोर्ट्स क्लब संघावर ८-६ असा २ गुणांनी विजय मिळवला.


























