सोलापूर : प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने येत्या शनिवार व रविवार, दि. ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी “प्रिसिजन संगीत महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.प्रिसिजनच्या परंपरेनुसार दोन्ही दिवस कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ठीक ६.२५ वाजता होणार आहे. महोत्सवाचे हे अकरावे वर्ष आहे. सोलापूरमधील हुतात्मा स्मृति मंदिर येथे हा स्वरमहोत्सव रंगणार असल्याची माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दोन सत्रांत कार्यक्रम होणार आहेत.पहिल्या सत्रात प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांचे सतारवादन होईल. त्यांना पांडुरंग पवार तबल्यावर साथ करतील. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना सौरव दांडेकर (हार्मोनियम) आणि अजित किंबहुने (तबला) तर प्राची जोगळेकर (तानपुरा) साथसंगत करतील.
रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक एस. आकाश यांचे बासरीवादन होईल. त्यांना ईशान घोष तबल्यावर साथ देतील. याच सत्रात यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिनवादन सादर होणार आहे. महोत्सवाच्या अंतिम सत्रात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आपली स्वर-साधना रसिकांसमोर मांडतील. त्यांना प्रशांत पांडव (तबला) आणि अभिषेक शिनकर (हार्मोनियम) वर साथसंगत करतील.
रसिकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहून जागतिक दर्जाच्या कलाकारांच्या स्वराविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे चेअरमन यतिन शहा आणि कार्यकारी संचालक करण शहा यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस माधव देशपांडे, नितीन फलटणकर आदी उपस्थित होते.
सोलापुरकरांचा स्वरोत्सव
शास्त्रीय संगीत आणि कलांचा प्रचार-प्रसार, नव्या श्रोत्यांमध्ये संगीताची गोडी निर्माण करणे आणि मोठ्या प्रमाणावर रसिकांपर्यंत कला पोहोचवणे या उद्देशाने “प्रिसिजन संगीत महोत्सव” सुरू करण्यात आला. मागील १० वर्षांत हा महोत्सव सोलापूर शहराची सांस्कृतिक ओळख बनला आहे.
निःशुल्क प्रवेशिका; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
सोलापूरकर रसिकांना या महोत्सवाचा आनंद निःशुल्क घेता येणार आहे. निःशुल्क प्रवेशिका (फ्री पासेस) मंगळवार दि. ३ फेब्रुवारीपासून हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत उपलब्ध असतील. प्रवेशिकांसाठी सिकंदर शेख (मोबाईल :९८२२८९७९६२) यांच्याशी संपर्क साधावा. रसिकांनी आपले नाव नोंदवून प्रवेशिका घ्याव्यात. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर आसन व्यवस्था राहणार आहे.


























