पंढरपूर – वारकरी संप्रदायाचे आद्यप्रवर्तक, श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पंढरी नगरीत भव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती अ.भा. संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. महेश ढवळे यांनी दिली.
संत नामदेव महाराज स्मारक कामाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि.३०) नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर बोलताना अॅड. ढवळे यांनी माहिती दिली.
संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी चंद्रभागा नदीच्या पलीकडे भक्तीसागर येथे रेल्वे विभागाची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून याठिकाणी दहा एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत सोलापूर, पुणे व मुंबई येथे मंत्री, अधिकार्यांसमवेत अनेक बैठका पार पडल्या. याबाबत अनेक समस्या निर्माण होत होत्या. अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.
पंढरी नगरीत जुलै महिन्यात झालेल्या श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीत येणार्या अडचणी दूर करून लवकरच स्मारकाचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.३०) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली.
पुढे बोलताना अॅड. महेश ढवळे म्हणाले, सुमारे १० एकर जागेमध्ये संत नामदेव महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे समारक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाने ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून लवकरच स्मारकाचे काम सुरु होणार आहे. या कामासाठी राज्याचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
स्मारक उभारणीसंदर्भात अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघ व नामदेव समाजोन्नती परिषद, श्री केशवराज संस्था पंढरपूरचे अध्यक्ष रुपेश खांडके, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर व सोलापूरच्या पदाधिकार्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर स्मारकाच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून लवकरच हे काम सुरु होणार असल्याचे अॅड. महेश ढवळे यांनी सांगितले.
यावेळी एकसंघाचे उपाध्यक्ष नंदकुमार कोसमतवार, नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव अजय फुटाणे यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
——————————-
भागवत धर्माची पताकाही उभारा
संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर फडकावून भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. या पार्श्वभूमीवर पंढरीत चंद्रभागेच्या तिरी उभारण्यात येणार्या संत नामदेव महाराजांच्या स्मारकाजवळ भागवत धर्माची उंच पताका उभारण्यात यावी अशी मागणी पंढरपुरातील सर्व महाराज मंडळी, वारकरी, फडकरी मंडळी व समस्त नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आली असून ती मान्य करण्यात आली असल्याची माहिती अ.भा.संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली.
























