हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यामधील पांवटा साहिब इथल्या हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये मोठा गोंधळ झाला. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या फार्मसीच्या 90 विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाने दंड ठोठावला आहे.
अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक करण्यात आला. यापार्श्वभूमीवर देशभरात विविध धार्मिक आणि समाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. असाच कार्यक्रम हिमाचलप्रदेशच्या पावंटा साहिब येथे देखील आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये फार्मसीचे शिक्षण घेणारे 90 विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल कॉलेज प्रशासनाने या 90 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हा दंड न भरल्यास कॉलेजमधून काढण्याची धमकी देण्यात आलीय. या कारवाईमुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची भावना निर्माण झालीय.
अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये उत्सव साजरा करण्यात आला. तसेच, यानिमित्ताने राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, पांवटा साहिबमध्ये हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित असलेल्या जवळपास 90 विद्यार्थ्यांवर कारवाई केली. सुट्टी जाहीर करूनही परवानगी न घेता गैरहजर राहिल्याने कॉलेजने विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यात आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना 23 जानेवारी रोजी वर्गाबाहेर उभे करण्यात आले. तसेच 2500 रुपयांचा दंड भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला आणि दंड न भरल्यास कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.
कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे स्थानिक हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. विविध हिंदू संघटनांच्या लोकांनी कॉलेजच्या गेटवर निदर्शने करत कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुलांना हजेरी लावण्यासाठी कॉलेजने तालिबानी आदेश देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. हिंदू संघटनांचे लोक कॉलेजच्या एचओडीला बडतर्फ करण्याची आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, प्रकरण चिघळत असल्याचे पाहून स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप केला. डीएसपी व तहसीलदार यांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांशी तसेच कॉलेज प्रशासनाशी चर्चा केली. तसेच, कॉलेजच्या एचओडीला 5 फेब्रुवारीपर्यंत रजेवर पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. तहसीलदार ऋषभ शर्मा यांनी प्रकरण शांत झाले असून तपास केला जात असल्याचे सांगितले. तर कॉलेजचे उपाध्यक्ष डॉ. अभिनय पुरी यांनी सांगितले की, कॉलेजने आपल्या स्तरावर एक समिती स्थापन केल्याची माहिती दिली.