आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जपान दौऱ्यावर टीका केली होती. फडणवीसांचा जपान दौरा सरकारी खर्चावर झाल्याचा आदित्य यांनी जीआर दाखवला होता. त्याला आता आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून ठाकरे आणि भाजप पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकल्याचे दिसत आहे. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडील आजारी असताना सरकारी पैशांवर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने इतरांना शहाणपण शिकवू नये, अशी खरमरीत टीका शेलार यांनी एक्सवरून केली. फडणवीस यांच्या दौऱ्याचा खर्च हा जपाननेच केल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका केली होती. नागरिकांच्या पैशावर विदेशवारी करू नका, असे ते म्हणाले होते. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या जपान दौऱ्यासंदर्भात जीआर दाखवित या दौऱ्यावर केलेल्या खर्चावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले होते.
आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला शेलार यांनी उत्तर दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला. ते शासकीय अतिथी या नात्याने तिकडे गेले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्याचा खर्च त्या देशाचे सरकारकडून केला जातो. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत गेलेल्या अधिकाऱ्यांचा खर्च केलेला आहे. जपान दौऱ्यात फडणवीस यांनी साधले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण माहिती त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे, याकडे शेलार यांनी लक्ष वेधले.
‘बालबुद्धीमुळे असे होते’
वडील आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणाऱ्याने इतरांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. परंतु त्याचा कळस गाठू नका, अशी टीकाही त्यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना केली. या पोस्टसोबत त्यांनी जपानच्या वाणिज्य दूतावासाचे एक पत्रकही जोडले.