कोणतीही कारवाई कधी कोणी जाणूनबुजून करत नाही. मागच्या वर्षी श्रीनिवास पवार यांच्या कारखान्यालादेखील नोटीस आली होती. आमच्याही अनेक संस्थांना नोटीस आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला देखील नोटीस आली. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचं ते काम करत असते. नोटीसला उत्तर दिलं तर तो प्रश्न संपून जातो. त्याला राजकीय स्वरूप कोणी देऊ नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती ॲग्रोवरील कारवाईबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, वर्षा बंगल्यावर मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस बसलो होतो. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहोत. राज्यात वेगवेगळे प्रश्न असतात. त्यामुळे आम्ही त्यावर एकत्र बसून चर्चा केली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही चर्चा केली. गणपती झाले, ईद झाली. आता छटपूजा आली. त्यामुळे त्यावर बसून चर्चा केली.