भागीदारीत असलेल्या हॉस्पिटलचे सर्व अधिकार ताब्यात ठेवून हॉस्पिटलचे साहित्य व बँकेत जमा केलेली रक्कम असा सुमारे ७ लाख ५५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी डॉ. पंकज आनंदराव सोनोने (वय ४२, रा. देवांग कॉम्प्लेक्स, इंदिरानगर, नाशिक) व आरोपी ओम्कार सुरेश यादव (रा. विजयलक्ष्मी अपार्टमेंट, पाथर्डी रोड, नाशिक) यांनी सूर्या हॉटेलच्या पाठीमागे प्रसन्ना कॉलनी, इंदिरानगर येथे श्रीयश हॉस्पिटल भागीदारीमध्ये सुरू केले होते. दरम्यान, दि. २९ डिसेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आरोपी ओम्कार यादव याने खोटे दस्त बनवून कोटक महिंद्रा बँकेचे शरणपूर रोड शाखेचे चालू अकाऊंट बनवून हॉस्पिटलचे सर्व अधिकार स्वत:च्या ताब्यात ठेवले.
त्यानंतर वेळोवेळी भागीदारीच्या आलेल्या उत्पन्नाचे हॉस्पिटलमध्ये व बँकेत जमा केलेले पैसे फिर्यादी सोनोने यांची कोणतीही परवानगी न घेता परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी काढून घेतले, तसेच हॉस्पिटलमध्ये असलेले डीफिब्रिलेटर मशीन, नोट काऊंटिंग मशीन, सीसीटीव्ही डीव्हीआर असे साहित्य घेऊन जात सुमारे ७ लाख ५५ हजार ४५८ रुपयांचा अपहार करून विश्वासघात केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.