अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी धाड टाकली आहे. दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अमानतुल्ला खान हे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असून वक्फ बोर्डातील अनियमिततेशी संबंधित प्रकरणी दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन एफआयआर दाखल केले होते. याच प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे पथक दिल्लीच्या ओखला परिसरात मंगळवारी सकाळी 6.30 वाजता दाखल झाले. त्यानंतर सकाळी 7.30 वाजता पथकाने अमानतुल्ला यांच्या निवासस्थानी छापा टाकला. गेल्या वर्षी एसीबीने दिल्लीतील अमानतुल्लाशी संबंधित 5 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात 12 लाख रुपये रोख, 1 विनापरवाना बेरेटा पिस्तूल आणि 2 वेगवेगळ्या बोअरची काडतुसे जप्त करण्यात आली होती.