भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयसीसी वर्ल्डकपमधील लढत दिल्लीतील अरुण जेठली मैदानावर होणार आहे. ही लढत भारतासाठी तुलनेत सोपी असली तरी कर्णधार रोहित शर्मासाठी मोठी कठीण असणार आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये भारताची दुसरी लढत अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. ही लढत उद्या ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होईल. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. तर अफगाणिस्तानचा पहिल्या लढतीत बांगलादेशकडून पराभव झाला होता. दुसऱ्या लढती विजय मिळून गुणतक्त्यात टीम इंडिया स्वत:चे स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. तर अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर करण्यासाठी मैदानात उतरेल.
भारताचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भोपळा फोडता आला नव्हता. जोश हेजलवुडचा आत येणाऱ्या चेंडूवर रोहित बाद झाला होता. आता अफगाणिस्तानविरुद्ध त्याची मोठी परीक्षा असणार आहे. अपगाणिस्तानचा मुख्य लेग स्पिनर राशिद खानविरुद्ध रोहितला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले आहेत आणि दर वेळा राशिद खान वरचढ ठरला आहे.
आयपीएलमध्ये राशिदने रोहित शर्माला २६ चेंडू टाकले आहेत. त्यावर रोहितने फक्त २९ धावा केल्या आहेत तर राशिदने त्याला ४ वेळा बाद केले आहे. रोहितची राशिदविरुद्धची सरासरी फक्त ७.२ इतकी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राशिदने रोहितला फक्त ८ चेंडू टाकले आहेत ज्यात रोहितने २ षटकारांच्या मदतीसह २० धावा केल्या आहेत. आता दिल्लीत प्रथमच दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर असतील.
दिल्लीत होणाऱ्या या लढतीत धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिा आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यता ७५० हून अधिक धावा झाल्या होत्या. आता भारताच्या मॅचसाठी देखील तसे पिच असणार आहे. एकदा का रोहित सेट झाला तर राशिद खान देखील त्याला रोखू शकणार नाही.अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर भारत १४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध मॅच खेळणार आहे. ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नाही. १९९२ पासून २०१९ पर्यंत भारताने पाकविरुद्धच्या सर्व लढती जिंकल्या