केवळ वार्षिक एक रुपया नाममात्र लीज वर तीन भूखंड शाळेसाठी मुंबई महापालिकेने चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या संस्थेला काही अटी व शर्तींवर अनुक्रमे ६० व ३० वर्षांसाठी देण्यात आले होते. गेल्या ४० वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या या भूखंडावर शाळा चालवली जात आहे. परंतु चिल्ड्रन वेल्फेअर संस्थेने अटी व शर्ती पूर्णपणे धाब्यावर बसल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबईतल्या अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा यारी रोड येथील न. भू. क्र. १०३५ तसेच न. भू. क्र. ११२१ (अ) गाव वर्सोवा व न. भू. क्र. 163 (सी) गाव वाळणई, मालाड (पश्चिम) या जागा चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर या संस्थेला माध्यमिक शाळा चालवण्यासाठी व ३०% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी देण्यात आल्या आहेत. या अटी व शर्तीचे उल्लंघन संस्थेचे अध्यक्ष अजय कौल तसेच व्यवस्थापक प्रशांत काशीद यांनी केले आहेच पण महापालिकेची जागा दुसऱ्या संस्थांना ऑर्चिड व फेरीलँड यांना भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे अटी व शर्तींचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले आहे.
महापालिकेच्या कुठल्याही परवानग्या न घेता ग्रॅज्युएशन कॉलेज तसेच लॉ कॉलेज उघडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले असून सहा बँक्वेट हॉल बांधून व्यवसायिक उत्पन्नही मिळवले जात आहे. ओसी नसताना शाळा चालवली जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने उद्या कुठली दुर्घटना घडू नये याची काळजी घेणे महत्त्वाचे असतानाही अशा पद्धतीने मुलांच्या जीवाशी खेळले जात असल्याची तक्रार झाली. पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले होते.
पालकांकडून कोट्यावधीची लूट करणाऱ्या चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या जमिनीच्या लीज चे उल्लंघन झाल्यामुळेही संस्था अडचणीत आली आहे. शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवत असणाऱ्या संस्थेच्या ट्रस्टींवर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. शिवाय सी आर झेड चे उल्लंघनही झाल्याने लीज रद्द करण्याशिवाय शासनाकडे पर्याय उरलेला नाही.
राष्ट्रीय भ्रष्टाचार एवं अपराध निवारक परिषद चे अध्यक्ष श्री. मोहन कृष्णन यांनी आरटीआय मार्फत कागदपत्रे काढून या संदर्भात तक्रार केली होती. ही तक्रार यांनी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याकडे केली होती.