हिंसाचार नोकऱ्या देऊ शकत नाही आणि विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणे आवश्यक आहे. देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी आदिवासी युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. स्वतः चुकीच्या मार्गावर न चालणे आणि इतरांना तसे करू न देणे, ही आदिवासी युवकांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. नवी दिल्ली येथे आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रम (TYEP) अंतर्गत 200 आदिवासी युवकांशी त्यांनी संवाद साधला. गृह मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांपासून आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रम सुरू आहे.
आदिवासी युवकांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज आदिवासी समाजातील लोकांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. ते म्हणाले की, ही अभिमानाची बाब आहे की, आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 200 कोटी रुपये खर्चून देशभरात 10 आदिवासी संग्रहालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, नक्षलवादी आणि त्यांची विचारधारा देशाच्या विकासाच्या आणि उज्ज्वल भविष्याच्या विरोधात आहे. ज्यांना नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर, रस्ते आणि इतर आवश्यक सुविधा व्हायला नको आहेत, ते तरुणांच्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत असे शाह म्हणाले.
आदिवासी युवकांनी आपापल्या घरी परत गेल्यावर सर्वांना सांगावे की आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि आदिवासींसाठी प्रत्येक क्षेत्रात मुबलक संधी आहेत असे अमित शाह म्हणाले. जन्मस्थान महत्त्वाचे नसते, तर माणसाने आयुष्यात केलेले काम महत्त्वाचे असते असे ते म्हणाले. ते म्हणाले की, धन, ज्ञान आणि सन्मान केवळ कठोर परिश्रमानेच मिळवता येतो.