भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा यांना आळा घालण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी करण्यात आली. पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर पाचशेची नवी नोट आणण्यात आली. दोन हजाराची नोट बाजारात आली. त्यानंतर दोन हजाराची नोट चलनातून बाद करण्यात आली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनाच प्रश्न पडला, हजाराची नोट पुन्हा चलनात येणार का?
सध्या चलनात असलेल्या सर्वात मोठ्या नोटेचं मूल्य ५०० रुपये आहे. दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे हजाराची नोट पुन्हा चलनात येईल अशी शक्यता अनेकांना वाटते. त्याबद्दल चर्चाही सुरू असतात. आता याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाचशे रुपयांची नोट पुन्हा बाजारात आणण्याचा आरबीआयचा कोणताही विचार नसल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं दिलं आहे. मात्र अद्याप तरी आरबीआयनं याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा ‘केवल कागज का तुकडा’ झाल्या. पण त्यानंतर ५०० रुपयांची नोट नव्या रुपात चलनात आली. हजार रुपयांच्या जागी दोन हजारांची नोट बाजारात आणली गेली. १९ मे २०२३ रोजी आरबीआयनं २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत असल्याचं म्हणत त्या बदलून घेण्यास सांगितलं. त्यासाठीची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ देण्यात आली. त्यानंतर ही मुदत वाढवून ७ ऑक्टोबर करण्यात आली.