इस्त्रायलच्या हल्ल्याने बेजार झालेल्या पॅलेस्टाईनमधील युद्ध पीडितांसाठी आज, रविवारी भारतातून मदत सामग्री पाठवण्यात आली. तब्बल 40 टन औषधे आणि खाद्य सामग्री घेऊन वायुसेनेचे सी-17 विमान पॅलेस्टीनला रवाना झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
यासंदर्भातील ट्विटमध्ये, बागची म्हणाले की, पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन आयएफए सी-17 विमान इजिप्तमधील अल-अरिश विमानतळावर रवाना झाले. या साहित्यांमध्ये जीवन रक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, झोपण्यासाठी तंबू, पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्तता आणि इतर आवश्यक वस्तूंसह पाणी शुद्धीकरण गोळ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी नुकताच दूरध्वनीवरून संवाद साधला. तसेच भारत पॅलेस्टिनी लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील, असे आश्वासनही दिले.
गाझामधील अल अहली हॉस्पिटलमध्ये एका रॉकेट हल्ल्यामुळे मारल्या गेलेल्या नागरिकांच्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला होता. भारत आणि या प्रदेशातील पारंपारिकपणे जवळचे आणि ऐतिहासिक संबंध अधोरेखित करत पंतप्रधानांनी दहशतवाद, हिंसाचार आणि या भागातील ढासळत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.पॅलेस्टीनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि भारताच्या भूमिकेचे कौतुक केले.
इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाच्या भोवऱ्यात पॅलेस्टाईनचे लोक अडकले आहेत. इस्रायलने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची शपथ घेतली आहे. दरम्यान मानवतावादी मदत घेऊन जाणाऱ्या तब्बल 20 ट्रकना शनिवारी इजिप्तच्या रफाह सीमेवरून गाझा पट्टीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.