मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्येचे लोण आता धनगर आरक्षणापर्यंत पोहोचले आहे. जत तालुक्यातील (जि. सांगली) कुणीकोनूर येथील आबाचीवाडी येथे धनगर आरक्षणासाठी बिरुदेव वसंत खर्जे (३८) या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तशा आशयाची मजकूर असलेली चिठ्ठी त्याच्या पॅंटच्या खिशात मिळाली आहे. त्यामध्ये आपण धनगर आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवित असून याबद्दल नातेवाईकांना त्रास देऊ नये, असा मजकूर लिहिला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातल्या झाडाला गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केली आहे. गावातील ग्रामस्थांनी देखील धनगर आरक्षणासाठी सदर तरुणाकडून आत्महत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
मुलीने दिली घरच्यांना माहिती
राज्यात मराठा व धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजातील दोघांनी आरक्षण मिळावे, यासाठी जीवनयात्रा संपवली आहे. रविवारी आरेवाडी येथे दसरा मेळावा झाला. बिरुदेव खर्जेने मेळावा घरात बसून मोबाईलवर पाहिला. त्यानंतर काही वेळाने तो घरातून शेताकडे निघून गेला. बिरुदेवची मुलगी शेताकडे पाण्याची मोटार बंद करण्यास निघाली होती. तिने बिरुदेवचा मृतदेह झाडावर पाहिला. मुलीने ही घटना घरच्यांना सांगितली.
एकीकडे सांगलीतील आरेवाडी येथे धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत असताना दुसऱ्या बाजूला या तरुणाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. धनगरांना आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे, या मागणीने मागील दशकभरापासून जोर धरला आहे.