आमदार अपात्रता प्रकरणाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी घ्यायच्या सुनावणीचे सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. या सोबतच अध्यक्ष नार्वेकर देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांचीही भेट घेणार आहेत. यामध्ये वेळापत्रकात नेमके काय बदल करायचे? यावर कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे.
सुनावणी घेण्यात होत असलेल्या दिरंगाईबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तयार केलेल्या वेळापत्रकाबाबत आधीच न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर अध्यक्षांना सुनावणीबाबत सविस्तर माहिती देऊन सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर येण्यास सांगितले आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अत्यंत कठोर शब्दांत फटकारत वेळापत्रक फेटाळले आणि सुधारित वेळापत्रक दाखल करण्यास सांगितले. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
विधानसभा आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारले आहे. या सुनावणीचे वेळापत्रक 30 ऑक्टोबरला सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि दोन महिन्यांत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.