आंध्रप्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात झालेला रेल्वे अपघात ‘सिग्नल ओव्हरशुटिंग’मुळे झाल्याची माहिती पुढे आलीय. यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 54 हून अधिक लोक जखमी झाले आहे.
या अपघाताबाबत ईस्ट कोस्ट रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर आणि दुसऱ्या ट्रेनला धडकल्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास झाल. विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन (गाडी क्र.08532) आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल (गाडी क्र. 08504) यांच्यात धडक झाली. या 2 गाड्यांची टक्कर मानवी चुकांमुळे झाली असावी. मुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत साहू म्हणाले की, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने सिग्नलचे ‘ओव्हरशूटिंग’ केले होते. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या. जेव्हा एखादी ट्रेन रेड सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते तेव्हा असे घडते. अपघातामुळे विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे (ट्रेन क्रमांक 08532) मागील दोन डबे आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरचे लोको कोच (ट्रेन क्रमांक 08504) रुळावरून घसरले.
या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वेने मदतीसाठी 8912746330, 8912744619, 8106053051, 8106053052, 8500041670 आणि 8500041671 हे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. अपघात मृत्यूमुखी पडलेल्या आंध्रप्रेदशातील मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत आणि इतर राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत. तर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.