कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामासाठी गाळपास येणार्या सर्व प्रकारच्या उसाला 2400 रुपयांचा पहिला हप्ता तर अंतिम दर 2900 रुपये देईल, अशी घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केली.
कारखान्याच्या 51 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ नंदगाव, ता. तुळजापूरच्या शांतलिंगेश्वर विरक्तमठाचे परमपूज्य श्री म.नि.प्र. राजशेखर महास्वामीजींच्या अमृतहस्ते धार्मिक विधीने उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. यावेळी ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तत्पूर्वी गाळपासाठी आलेल्या ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी आणि काट्याचे पूजन सिद्राम शिंदे, सिद्राम हेळकर, शंकर पाटील आणि माजी नगरसेवक सुभाष शेजवाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चिमणी पाडल्यानंतरसुध्दा कारखाना सुरू करण्यासाठी थरमॅक्स कंपनीचे प्रसाद, जय हनुमान वर्क्सचे नाथन यादव आणि अमर यादव यांनी मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आला.