जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आज, गुरुवारी पाकिस्तानने गोळीबार केला. स्थानिक रामगढ सेक्टरमधल्या नयनपूर चौकीवर झालेल्या या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचे निधन झाले. लाल फर्न किमा असे शहीद जवानाचे नाव आहे.
एकीकडे पाकिस्तान आर्थिक आघाडीवर देशोधडीला लागलाय. परंतु, त्याच्या कुरापती सुरू असून गेल्या 3 आठवड्यात पाकिस्तानने तब्बल तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेय. यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला होता. यामध्ये बीएसएफचे 2 जवान जखमी झाले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबरला पाकिस्तानने दुसऱ्यांदा गोळीबार केला. यात जम्मूच्या अरनिया आणि सुचेतगड सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात बीएसएफ जवान आणि एक महिला जखमी झाली होती. बीएसएफच्या पीआरओकडून मिळालेल्या माहितीनुसार आज, गुरुवारी सकाळी 8 वाजून 15 मिनीटांनी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात बीएसएफचा जवान लाल फर्न किमा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भारत-पाकिस्तान यांच्यात 2021 मध्ये झालेल्या शांतता करारानंतर गेल्या 3 आठवड्यांपासून पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. भारताकडून पाकिस्तानच्या कुरापती आणि भ्याड कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जातेय. रामगढच्या नयनपूर चौकीवर झालेल्या पाकिस्तानी गोळीबारानंतर अरनिया सेक्टरमध्ये तैनात भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
यासोबतच बुधवारी रात्री उशिरा शोपियानच्या कटोहलन भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) एक दहशतवादी मारला गेला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला असून इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.