उत्तरकाशी: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शक्यता नाकारता येत नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली ५०-६० मजूर अडकल्याची माहिती आहे. या पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला होता आणि इमारती, रस्ते आणि महामार्गांचे नुकसान झाले होते.
उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. आतमध्ये कामगारांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्याच्या आत एक अतिरिक्त ऑक्सिजन पाईप देखील देण्यात आला आहे. बोगद्यात सर्व कामगार सुरक्षित आहेत. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिल्क्यराकडे जाणाऱ्या २०० मीटर अंतरावर हे भूस्खलन झाले, तर बोगद्यात काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या २८०० मीटर आत होते.
घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्याची जबाबदारी घेतली. पोलिस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, आपत्कालीन १०८ आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL), बोगदा बांधणारी संस्था (NHIDCL) चे कर्मचारीही घटनास्थळी बोगदा उघडण्यात व्यस्त आहेत. चार धाम रोड प्रकल्पांतर्गत या बोगद्याच्या निर्मितीमुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास २६ किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे.
यावर्षी ऑगस्टमध्ये, शिवपुरी भागातील पुराच्या प्रवाहाच्या पाण्याने भरलेल्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लाईन प्रकल्पाच्या ‘एडिट-II’ नावाच्या बोगद्यात सुमारे ११४ कामगार अडकले होते. मात्र, पोलिसांच्या पथकाने पाणी बाहेर काढले आणि दोरीच्या सहाय्याने सर्व ११४ कामगारांची सुटका केली.