आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथील मासेमारी बंदरात रविवारी रात्री भीषण आग लागली. यात शिप-यार्डातील 40 मासेमारी नौका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
विशापट्टणमचे डीसीपी आनंद रेड्डी यांनी सांगितले की, विशाखापट्टणमच्या फिश पोर्टला लागलेली आग मध्यरात्री सुमारे 40 फायबर-यंत्रीकृत बोटींमध्ये पसरली. पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने कारवाई केली. आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. काही गुन्हेगारांनी बोटींना आग लावल्याचा संशय मच्छिमारांना आहे. एका बोटीत पार्टी झाल्यामुळे ही आग लागल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. बंदरातील धक्कादायक दृश्यांमध्ये अग्निशामक दल आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. उदरनिर्वाहाचे साधन उद्ध्वस्त झाल्याने मच्छीमार असहाय्यपणे आग पाहत होते. काही बोटींमध्ये स्फोटही झाले. दरम्यान या आगीमुळे सुमारे 40 मासेमारी नौका जळून खाक झाल्या आहेत. प्रत्येक बोटीची किंमत किमान 40 लाख रुपये असल्याचे स्थानिक मासेमाराने सांगतले.