रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन रायगडमधील कर्जत येथे पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. अजित पवारांनी शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी काय घडलं? हे सांगितलं. शरद पवारांकडून आम्हाला गाफील ठेवलं जात होतं, असं अजित पवार म्हणाले. राजीनामा मागं घेण्यासाठी शरद पवारांच्या आदेशानेचं आंदोलनं सुरु होती, असं देखील अजित पवार म्हणाले.
आम्हाला सातत्यानं गाफील ठेवलं गेलं. मी मागं जात नाही पण यामध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमुखापासून सगळ्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. प्रफुल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आम्ही दहा बारा जण होतो. देवगिरीला बसलो होतो. आम्ही काय करायचं असा विचार करत होतो. थेट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल याचा विचार करुन सुप्रिया सुळेंना घरी बोलावलं होतं. त्यांना सांगितलं की लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो. तरच संघटना पुढे जाते. त्यांनी सात दिवसांचा वेळ मागितला, शरद पवारांना कन्व्हिन्स करते, असं त्या म्हणाल्या, असं अजित पवारांनी सांगितलं.
शरद पवारांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेतलं, युवक आणि महिला आघाडीच्या लोकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेर आंदोलन करायला सांगितलं होतं. तिथं काही जण आंदोलन करत होते, तिथं एकही आमदार नव्हता, जितेंद्र आव्हाड सोडले तर असं अजित पवार म्हणाले.