घरामध्ये महिला एकटीच असताना घरामध्ये जाऊन झोंबाझोंबी केल्याचा व्हिडीओ काढल्यानंतर तो तुझ्यासमोर डिलिट करतो असे सांगून महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवत, एका हॉटेलजवळील कार्यालयात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यावर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस कर्मचाऱ्याने एका महिलेस फोन करून शहरातील एका शाळेजवळ बोलावून घेतले. महिला तेथे गेल्यानंतर तिला तुझ्यासमोर तुझे फोटो, व्हिडीओ डिलिट करतो, तू सोबत चल. असे म्हणाला. महिलेने नकार दिला असता, त्याने पांढऱ्या रंगाच्या जीप क्र.एमएच-१३ सी- २०२१ मध्ये तिला जबरदस्तीने बसवले. तेथून तिला जुना एम्लॉयमेंट येथील एका हॉटेलजवळ असलेल्या नातेवाइकाच्या ऑफिसमध्ये नेले. दरम्यान ऑफिसमध्ये कोणी नव्हते, तेथे त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला.
दरम्यान, त्याने मोबाईलमध्ये फोटो काढले. तू कोणाला काही सांगू नकोस, अन्यथा तुझा व्हिडीओ व्हायरल करतो. तुझ्या पतीला संपवतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा त्याने घेऊन गेलेल्या शाळेच्या ठिकाणी आणून सोडले. तालुका पोलिस ठाण्यात आकाश बाळासाहेब राजपूत (शिवाजीनगर तांडा, केगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेथून हा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंदसिंह क्षीरसागर करीत आहेत.