एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (एनजीईएल) दरवर्षी 1 दशलक्ष टन क्षमतेच्या हरित हायड्रोजन आणि अंतर्निहित घटकांच्या (हरित अमोनिया, हरित मिथेनॉल) विकासासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. ज्यामध्ये 2 गिगावॅट पंप साठवण प्रकल्पांचा आणि राज्यात 5 गिगावॅटपर्यंत साठवणुकीसह किंवा साठवणुकी व्यतिरिक्त अक्षय ऊर्जा प्रकल्प विकासाचा समावेश आहे.
पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्र सरकारच्या हरित गुंतवणूक योजनेचा एक भाग म्हणून या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. करारामध्ये अंदाजे 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. एनजीईएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव आणि राज्य शासनाचे उपसचिव (ऊर्जा), नारायण कराड यांच्यात सोमवारी 29 जानेवारी रोजी हा सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्मितीचे लक्ष्य आहे.एनजीईएल ही एनटीपीसीच्या मालकीची उपकंपनी आहे आणि एनटीपीसी च्या अक्षय ऊर्जा प्रवासाचा ध्वजवाहक बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. तिची कार्यान्वयन क्षमता 3.4 गिगावॅट पेक्षा अधिक असून 26 गिगावॅटचे निर्धारित उद्दिष्ट आहे ज्यापैकी 7 गिगावॅटबाबत अंमलबजावणी सुरू आहे.