राज्यसभेतील सर्वपक्षीय 56 खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपतो आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज, गुरुवारी या खासदारांच्या आभार प्रदर्शनाची चर्चा राज्यसभेत पार पडली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्यसभेतील निवर्तमान खासदारांना जुन्या आणि नव्या दोन्ही संसदेच्या इमारतींमध्ये राहण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व मित्र स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळाच्या नेतृत्वाचे साक्षीदार आहेत. कोरोना साथरोगाच्या कठीण काळात आपण सर्वांनी परिस्थिती समजून घेतली, परिस्थितीशी जुळवून घेतले आणि कोणत्याही पक्षाच्या खासदाराने देशाचे काम थांबू दिले नाही असे पंतप्रधानांनी सांगितले.कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. यावेळी मोदी म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग हे 6 वेळा सभागृहाचे सदस्य राहिले आहेत, त्यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, पण त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी सभागृहाला अनेकदा मार्गदर्शन केले आहे. जेव्हा खासदारांच्या योगदानाचा उल्लेख येईल, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांची चर्चा नक्कीच होईल. डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर आले आणि एका प्रसंगी मतदान केले. ते लोकशाहीला बळ देण्यासाठी आले होते. विशेषत: त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे ही त्यांच्यासाठी प्रार्थना असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी सरकारच्या विरोधात ब्लॅक पेपर जारी करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी टीकास्त्र सोडले. काळा टिळा लावल्यामुळे प्रगतीला नजर लागत नाही आणि आज काळा टिळा लावण्याचा प्रयत्न झाल्याचा टोला त्यांनी लगावला. सभागृहाला काळ्या कपड्यांमध्ये फॅशन शो पाहण्याची संधी मिळाली. कधी कधी काही काम इतके चांगले असते की, ते दीर्घकाळ उपयोगी पडते. आमच्या जागी आम्ही काही चांगले काम केले तर आमच्या कुटुंबात एक नातेवाईक येतो आणि म्हणतो की नजर लागली तर काळा टिळा लावेन. गेल्या 10 वर्षात जी कामे झाली आहेत, त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून आज मल्लिकार्जुन खर्गेंज काळा टिळा लावून आले असून ही चांगली गोष्ट असल्याचे मोदींनी सांगितले. राज्यसभेतील निवर्तमान सदस्यांबद्दल आभारप्रदर्शनाच्या चर्चेत दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या बाबतीत आभारप्रदर्शन करताना आपली भूमिका मांडली.