लहान मुलांमधील जन्मजात विकृती, हृदय, किडनीशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीत एकूण एक हजार ६८६ शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. यात १५३ हृदय तर एक हजार ५३३ इतर आजारांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत १० हजार ते १० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित हृदय व इतर रोग शस्त्रक्रिया निःशुल्क करण्यात आल्या आहेत. जन्मानंतर काही लहान मुलांमध्ये जन्मतः व्यंग, हृदय, किडनीशी संबंधित आजार, पोषण द्रव्यांची कमतरता, शारिरीक व मानसिक विकासात्मक बदल आढळून येतात.तर हृदयातील छिद्रामुळे फुफ्फुसांकडे होणाऱ्या अतिरिक्त रक्तप्रवाहामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, वजन न वाढणे यासारख्या समस्या आढळतात. त्यामुळे अशा मुलांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.तर काही मुलांमध्ये दुभंगलेले ओठ, डोळ्यांचा तिरळेपणा, अस्थिरोग आदी जन्मजात विकृतीही आढळतात. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यामुळे या कार्यक्रमांतर्गत गंभीर आजारांवरील उपचारपूर्व तपासणी व शस्त्रक्रिया केली गेल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन बाल स्वास्थ्य मिशनने केले आहे.