जिल्ह्यात एक हजार १९ ग्रामपंचायती असून आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: ग्रामपंचायतींकडील व जिल्हा नियोजन समितीकडील १०० टक्के निधी आचारसंहितेपूर्वी खर्च करण्याचे आदेश आहेत. तरीदेखील सोलापूर जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींचा वर्षातील विकासकामांवरील खर्च २० टक्के सुद्धा झालेला नाही. विशेष म्हणजे त्यात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे गाव वाकावचाही समावेश आहे.
दुसरीकडे २३० ग्रामपंचायतींचा खर्च २० ते ५० टक्क्यांपर्यंतच आहे. दरम्यान, ५० टक्क्यांपेक्षा कमी खर्च झालेल्या २६२ ग्रामपंचायतींना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.पंधराव्या वित्त आयोगातून गावागावातील विकासकामांसाठी दरवर्षी मोठा निधी दिला जातो. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २०२०-२१ ते आतापर्यंत शासनाकडून एकूण ६०३ कोटी ५४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
कोरोनामुळे २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षात अपेक्षित खर्च होवू शकला नाही. त्यानंतर एप्रिल २०२३ ते आतापर्यंत ग्रामपंचायतींकडील निधी खर्च व्हायला पाहिजे होता. परंतु, अजूनही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे वित्त आयोगातील २१२ कोटींचा निधी अखर्चिक आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी वारंवार निर्देश देऊनही अनेक ग्रामपंचायतींनी विकासकामांवर अपेक्षित खर्च केलेला नाही.