खेळता खेळता त्याचा अचानक तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सार्थक कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तेथील विद्यार्थ्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने शाळेच्या परिसरात एकच शोककळा पसरली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, काळेवाडी परिसरात असणाऱ्या हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत सार्थक हा आठवीच्या वर्गात शिकत होता. सकाळी साधारण दहा वाजताच्या सुमारास तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. मात्र येथील रेलिंगवर घसरगुंडी खेळणं धोकादायक असल्याचे एका मित्राने तू इथं खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल असं म्हणत रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला.
मात्र त्याने तो ऐकला नाही, तो त्याच्याच धुंदीत होता. खेळता खेळता त्याचा अचानक तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या अपघातात सार्थकला बेदम मार लागल्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने त्याचा यात मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलिसांकडून केला जात आहे.
मुलांनी शाळेत येताना आपली काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच शिक्षकाचे देखील याकडे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास केला जात आहे.