उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली. सध्या औज बंधाऱ्यात आणखी दोन दिवस पुरेल इतके पाणी आहे. चर खोदून पाणी घेण्यात येत आहे. उद्या नवे पाणी आल्यानंतर औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे साडेचार मिटरने भरुन घेतले जातील. यामुळे पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणीप्रश्न सुटला आहे.
उजनीतुन सोडलेले पाणी दोन्ही बंधारे भरुन पुढे हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडले जाणार असल्याचे व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. पाण्याच्या पिवळसर रंगाबाबत बोलताना बंधाऱ्याच्या तळाशी शेवाळाचे प्रमाण खुप असते. त्यामुळे पाण्याचा रंग बदलला होता. मात्र नवीन पाणी आल्यानंतर पाण्याला पुर्वीचाच रंग येईल. शिल्लक पाण्याचा रंग जरी बदललेला असला तरी हे पाणी आरोग्यासाठी अपायकारक नसल्याचा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला असल्याचेही चौबे यांनी स्पष्ट केले.