वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला आहे. ओबीसी महासंघाशी युती करुन वंचितनं मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवला आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही राज्यात तिसरी आघाडी असेल. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी महासंघाशी युती जाहीर करत मविआवर टीका केली. यावेळी त्यांनी आठ जागांवर उमेदवारही जाहीर केले. भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिमसाठी आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. ओबीसी, दलित, जैन समाजाला अधिकाधिक संधी देण्याचा मानस आंबेडकरांनी बोलून दाखवला.
कोणाकोणाला उमेदवारी?
भंडारा- गोंदिया: संजय गजानंद केवट
गडचिरोली-चिमूर: हितेश पांडुरंग मढवी
चंद्रपूर: राजेश वर्लुजी बेल्ले
बुलढाणा: वसंत राजाराम मगर
अकोला: प्रकाश आंबेडकर
अमरावती: प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान
वर्धा: प्रा. राजेंद्र साळुंखे
यवतमाळ-वाशिम: खेमसिंह प्रतापराव पवार
जरांगे फॅक्टर अन् मविआवर टीका
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी काल चर्चा झाली. या निवडणुकीत जरांगे पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. याबद्दल विचार करण्यात यावा असं मी मविआला सुचवलं. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचितचा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी केला जात होता. पण मी ते होऊ देणार नाही, असं म्हणत आंबेडकरांनी ठाकरे आणि पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.