गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बंद असलेले बालगंधर्व रंगमंदिर आता नव्या रूपात, नव्या साजात पुणेकर रसिकांसमोर येत आहे. इमारतीसमोरील म्यूरल, भिंतींची रंगरंगोटी, व्हीआयपी रूम, मेकअप रूम, बैठक व्यवस्था, परिसर आदी सर्व गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराला नवी झळाळी मिळाल्याचे दिसून येत आहे. बालगंधर्व रंगमंदिर दिमाखात पुन्हा सुरू झाले आहे.
अनेक वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिराची दुरवस्था झाली होती. त्याविषयी सर्वजण ओरडत होते. मेकअप रूम, रंगमंदिरात डासांचा त्रास आदी कारणांमुळे सातत्याने दुरवस्थेचे ‘नाट्य’ अनुभवायला येत होते. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन त्वरीत दुरूस्तीचे आदेश दिले होते. अखेर आता बालगंधर्व रंगमंदिराची पूर्ण दुरूस्ती झाली आहे. रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते तसेच बालगंधर्व रंगमंदिराचे नवे रूप सर्वांना भावते आहे.