भारतीय नौदलाने नुकतीच २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली आहे. भारतीय नौदलाने वाचवल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी ‘आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी नौदलाचे आभारही मानले. त्यानंतर त्यांनी ‘भारत झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
भारतीय नौदलाने पाकिस्तानी नागरिकांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी नागरिक जहाजावर सुरक्षित दिसत आहेत. एफव्ही एआय कंबार ७८६ नावाच्या बोटीने ते इराणहून निघाले होते. पण त्यांना अरबी समुद्रात चाच्यांनी घेरलं आणि त्यांचं अपहरण केले. नौदलाने जहाजाचे अपहरण करणाऱ्या ९ सशस्त्र समुद्री चाच्यांना अटक केली आहे.
अपहृत जहाज आयएनएस त्रिशूल आणि आयएनएस सुमेधा यांनी अडवले. १२ तासांच्या संघर्षानंतर अखेर समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले. भारतीय नौदलाने पाकिस्तानी नागरिकांचे प्राण वाचवले. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे नौदलाने एका निवेदनात सांगितले.