माढा लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा बाळदादा मोहिते-पाटील यांनी केली होती. शरद पवारांनी सातारा दौऱ्यात मोहिते-पाटलांबद्दल सावध भूमिका जाहीर केली. शरद पवारांनी जाहीर केलेल्या राज्यातील पाच उमेदवारांमध्ये माढ्याचा उमेदवार नसल्याने माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेंस पवारांनी कायम ठेवला आहे. शरद पवारांसमोर माढ्याच्या उमेदवारीचा तिढा आहे की शांत व संयमी भूमिका घेत माढ्याचा उमेदवार जाहीर करण्याची रणनीती आहे? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीतून शरद पवार राज्यातील नऊ जागा लढण्याची शक्यता आहे. त्यापैकी बारामती, शिरूर, दिंडोरी, वर्धा आणि नगर या पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. पवारांच्या वाट्याला येणाऱ्या माढा, सातारा, बीड व भिवंडी या चार जागांवरील उमेदवारांचा निर्णय मागे ठेवल्याचे दिसत आहे. माढ्यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माणमधील उद्योजक अभयसिंह जगताप या चार नावांची चर्चा आहे.